July 26, 2025
WhatsApp Image 2025-06-13 at 19.33.29_b4911be1

ठाणे | दि. 14 जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी दि. 12 जून, 2025 रोजी भिवंडी तालुक्यातील विविध गावांना भेट देऊन विकास योजनांची अंमलबजावणी, अडचणी व गरजा यांचा प्रत्यक्ष आढावा घेतला.

प्राथमिक आरोग्य कोन (ता. भिवंडी) येथील आरोग्य केंद्राच्या इमारतीची पाहणी करण्यात आली. सद्यस्थितीत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन पर्यायी जागेची पाहणीही करण्यात आली. नवीन आरोग्य केंद्र उभारण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तत्काळ सादर करण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य व ग्रामपंचायत विभागाला दिल्या. दरम्यानच्या कालावधी मध्ये पर्यायी इमारतीची पाहणी केली व अनुषंगिक सुचना केल्या.

या भेटीदरम्यान गोवे व ओवळी या ग्रामपंचायतींमध्ये प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा दोन अंतर्गत “आवास प्लस सर्वेक्षण” शून्य नोंद असलेल्या गावांचा समावेश असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या गावांना भेट देऊन ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. योजनेबाबत सविस्तर माहिती घेतली आणि लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात यावी, याबाबत स्पष्ट सूचना दिल्या. भिवंडी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी अशाच पद्धतीने प्रत्यक्ष भेटी देऊन पुनश्च खात्री करावी आणि अहवाल तालुका स्तरावर सादर करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट निर्देश दिले की, लाभार्थ्यांना योजनेत समाविष्ट होण्याची ही शेवटची संधी आहे. कोणताही पात्र लाभार्थी सर्वेक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी एकत्रितपणे गावात लाभार्थी शिल्लक नाही याची खात्री करून घ्यावी. लाभार्थी आढळल्यास त्यांची नोंद पुढील दोन दिवसांत तात्काळ करण्यात यावी.

खोणी, काटई व खांबे या गावांना भेट देऊन थकीत पाणीपट्टी संदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी फ्लो मीटर आणि वॉटर मीटरची पाहणी करण्यात आली. सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ व स्टेम अधिकाऱ्यांच्या समवेत चर्चा करून थकीत पाणीपट्टीची वसुली तातडीने करण्यात यावी, अशा सूचना दिल्या.

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या या दौऱ्यामुळे ग्रामस्तरावर योजनांच्या अंमलबजावणीला गती मिळणार असून, थेट संवादातून नागरिकांच्या अडचणी वेळेत सोडविण्यासाठी मदत होणार आहे.‌

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *