
प्रकल्पासाठी शेतजमीन देऊनही मोबदला न मिळालेल्या वसई येथील शेतकऱ्याचा प्रश्न आमदार संजय केळकर यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून मार्गी लावत दिलासा दिला तर ठाण्यातील भीमनगर येथील एसआरए प्रकल्प क्लस्टरमधून वगळण्यास भाग पडल्याने तेथील रहिवाशांनी केळकर यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.
जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून ठाण्यासह आजूबाजूच्या शहरातील नागरिकही समस्या घेऊन येत आहेत. बहुतांशी समस्या जागीच निकाली काढल्या जात आहेत. आज न्याय मिळालेल्या नागरिकांनी आमदार संजय केळकर यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी खोपट कार्यालयात परिवहन सदस्य विकास पाटील, माजी उपमाहापौर सुभाष काळे, सचिन पाटील, दीपक जाधव राजेश गाडे उपस्थित होते.
आज खोपट येथील भाजपच्या मुख्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमात वसई येथील शेतकऱ्याने आमदार संजय केळकर यांची भेट घेत व्यथा मांडली. एका प्रकल्पात शेतजमीन संपादित झाली पण मोबदला देण्यात टाळाटाळ होत असल्याची तक्रार त्याने केली. यावेळी केळकर यांनी तत्काळ संबंधित महसूल अधिकाऱ्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्याने सकारात्मक प्रतिसाद देत शेतकऱ्याला लवकरात लवकर मोबदला देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल असे सांगितले. रखडलेला प्रश्न तत्काळ मार्गी लागल्याने शेतकऱ्याने केळकर यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

उपक्रमात ठाण्यातील भीमनगर येथील नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहत आमदार संजय केळकर यांचा सत्कार करून आभार मानले. येथे सुरू असलेला एसआरए प्रकल्प क्लस्टर योजनेत समाविष्ट करण्यात आल्याने येथील गोरगरीब रहिवाशांचा हक्काच्या घरांचा प्रश्न आ वासून उभा राहिला होता. रहिवाशांनी श्री. केळकर यांच्याकडे तक्रार केल्यानंतर श्री. केळकर यांनी पाठपुरावा करत एसआरए योजना क्लस्टरमधून वगळण्यास अधिकाऱ्यांना भाग पाडले. रहिवाशांचा घरांचा प्रश्न मार्गी लागल्याने त्यांनी केळकर यांचे आभार मानले.
शुक्रवारी झालेल्या या उपक्रमात बिल्डरने केलेल्या फसवणुकीची तीन प्रकरणे आ. केळकर यांच्याकडे सादर करण्यात आली. त्यावर त्यांनी तातडीने कार्यवाही सुरू केली. दोन सफाई कामगारांना वारसा हक्काचा लाभ मिळवून देण्यात आला. विशेष म्हणजे केळकर यांनी पाठपुरावा केल्याने प्रकल्पात बाधित नागरिकांना सोमवारी गाळेवाटप करण्यात येणार असल्याने रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
भाईंदर पाडा येथील नाल्याची सफाई न झाल्याने पावसाळ्यात नागरिकांना पूरस्थिती आणि आरोग्याचा प्रश्न भेडसावण्याची शक्यता असल्याने त्यांच्या तक्रारीनुसार श्री. केळकर यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून कार्यवाही सुरू केली. तर बीएसयुपी इमारतीमधील समस्या दूर करण्यासाठी अधिकाऱ्यांना कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना श्री. केळकर यांनी केल्या.
विजयनगर सोसायटीला मिळणार अखंडित वीज पुरवठा
गेले अनेक महिने विजयनगर को-ऑप. सोसायटीच्या इमारतींमधील शेकडो रहिवाशांचे अनियमित वीजपुरवठ्यामुळे हाल होत आहेत. येथील रहिवाशांनी श्री. केळकर यांच्याकडे तक्रार केल्यानंतर संबंधित महावितरण अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्यात आला. त्यामुळे या रहिवाशांना नियमित आणि पुरेशा वीज पुरवठ्याचा मार्ग मोकळा झाला आहे.