April 10, 2026

कोकणात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवासाठी रेल्वे प्रशासनाने जादा गाड्या सोडाव्यात यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के आणि कोकणातील महायुतीच्या सर्व खासदारांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली होती. सातत्याने केलेल्या मागणीचा रेल्वेने योग्य विचार करत जादा रेल्वे गाड्या आणि विशेष सोयीसुविधा दिल्याबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व खासदार नरेश म्हस्के यांनी सर्व खासदारांच्या वतीने रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे विशेष आभार मानले आहेत.कोकणवासीयांसाठी गणेशोत्सव हा खूप महत्त्वाचा सण आहे. त्यामुळे मुंबईसह देशभरात नोकरी-व्यवसाय करणारे कोकणवासी दरवर्षी गणेशोत्सवात आपल्या गावी जायची आतुरतेने वाट पाहतात. घराघरात बाप्पा येतो, गावागावात उत्सवाचे मंगल वातावरण निर्माण होतं. पण या उत्साहात आपल्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व सुरक्षित व्हायला हवा म्हणूनच खासदार नरेश म्हस्के यांनी वेळोवेळी रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून विविध सूचना केल्या आणि आनंदाची गोष्ट म्हणजे त्या सूचनांना गांभीर्याने घेत रेल्वे प्रशासनाने त्या पद्धतीने अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.  यावर्षी कोकण रेल्वेने मध्य, पश्चिम आणि दक्षिण रेल्वेसोबत समन्वय साधून तब्बल ३६६ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई, पनवेल, वडोदरा, बेंगळुरू, रत्नागिरी, कुडाळ, सावंतवाडी, मडगाव या ठिकाणांवरून चाकरमान्यांना गावी जाणं अधिक सोपं आणि सोयीचं होणार आहे. त्याचबरोबर वैद्यकीय सोयीसुविधांवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. २५ ऑगस्टपासून खेड, माणगाव, चिपळूण, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी रोड येथे पॅरा-मेडिकल कर्मचारी तैनात केले जातील. चिपळूण आणि रत्नागिरी येथील आरोग्य केंद्रांमध्ये २४ तास डॉक्टर, परिचारिका व बहुउद्देशीय कर्मचारी उपलब्ध राहतील आणि आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका सज्ज असतील, अशी माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानकांवर खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, विशेष तिकिट रांगा, प्री-प्रिंटेड तिकिटांची सोय, यात्री सहायता केंद्रे, राज्य परिवहन बस याची व्यवस्था करण्यात आली आहे. गर्दीचे नियोजन करण्यासाठी विशेष तपासणी, सीसीटीव्ही निगराणी, RPF व स्थानिक पोलिसांचा समन्वय यामुळे प्रवास अधिक सुरक्षित झाला आहे. त्याचबरोबर स्थानकांची स्वच्छता व आकर्षक सजावट यासाठीही प्रशासनाने योग्य पावले उचलली आहेत. गणेशोत्सवाचा आनंद प्रवासातही अनुभवता यावा म्हणून स्थानकांवर रांगोळ्या, विशेष प्रकाशयोजना, पूजा साहित्य व मिठाईचे स्टॉल्स, संगीत-कलासादरीकरण आणि सेल्फी पॉइंट्स तयार करण्यात आले आहेत. सातत्याने गणेश भक्तांकरता आणि सर्व खासदार ज्या मागण्या करत होते, त्या आमच्या सूचनांचा गांभीर्याने विचार करून रेल्वे प्रशासनाने या योजना राबवल्याबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे विशेष आभार मानले आहेत. चाकरमान्यांचा प्रवास सुखकर, सुरक्षित आणि आनंददायी व्हावा, त्यांच्या घरी बाप्पाचे आगमन सुख-समाधान घेऊन यावे, अशी खासदार नरेश म्हस्के यांनी बाप्पा चरणी प्रार्थना केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *