July 28, 2025
WhatsApp Image 2025-06-02 at 11.34.42_7feb8622

मराठी प्रेक्षकांची मने जिंकणारी सुपरहिट फ्रँचायझी ‘ये रे ये रे पैसा’ पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. धमाल विनोद, कमाल कथा आणि एकाहून एक भन्नाट पात्रे घेऊन ‘ये रे ये रे पैसा ३’ येत्या १८ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले असून यात अण्णा, आदित्य, बबली आणि सनी यांचा कूल अंदाज पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असतानाच आता या नवीन पोस्टरने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. या फ्रँचायझीने नेहमीच प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. त्यामुळे यंदा हे मनोरंजन तिप्पट होणार हे नक्की.

‘ये रे ये रे पैसा ३’ मध्ये कॉमेडीचा ट्रिपल धमाका असून एका नव्या मोठ्या गोंधळाची धमाल कहाणी उलगडणार आहे. यावेळी पाच कोटींचा आर्थिक घोटाळा आणि ते सुटवण्याच्या प्रयत्नात अण्णा, आदित्य, बबली आणि सनी यांच्यासोबत घडणाऱ्या भन्नाट घटना पाहाणे रंजक ठरेल. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे धर्मा प्रॉडक्शन्स प्रस्तुत अमेय विनोद खोपकर पिक्चर्स, उदाहरणार्थ निर्मित, न्युक्लिअर ॲरो पिक्चर्स यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून वर्डविझार्ड एंटरटेनमेंट यांनी सहनिर्मिती केली आहे. तसेच सुधीर कोलते, ओमप्रकाश भट्ट, नासीर शरीफ, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर, निनाद नंदकुमार बत्तीन, गिरीधर गोपाळकृष्ण धुमाळ हे निर्माते व सौरभ लालवाणी सहनिर्माते आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन संजय जाधव यांनी केले असून या चित्रपटात संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर यांच्यासह आणखी काही कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळतील.

दिग्दर्शक संजय जाधव म्हणतात, “ ‘ये रे ये रे पैसा ३’ हा या फ्रँचायझीच्या प्रवासातील एक मजेशीर नवीन टप्पा आहे. यातून होणारे प्रेक्षकांचे मनोरंजन हेच आमचे बळ आहे. यावेळी तिसऱ्या भागात तिप्पट मनोरंजन व एक वेगळा ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळेल,जो प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवेल.”

निर्माते अमेय खोपकर म्हणतात, “ या वेळी आमच्यासोबत धर्मा प्रॉडक्शन्ससारखी नामवंत संस्था जोडली गेल्यामुळे हा चित्रपट आमच्यासाठी अधिक खास झाला आहे. याचा दर्जा आणि विनोद सगळेच प्रेक्षकांना नव्याने भुरळ घालेल, याची मला खात्री आहे.”

धर्मा प्रॅाडक्शन्सचे अपूर्व मेहता म्हणतात, ‘’ या चित्रपटाच्या दोन्ही भागांनी यापूर्वीच प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्यामुळे आम्हाला खूप आनंद होतोय, की मराठीत आमचे पदार्पण या चित्रपटातून होतेय. एव्हीके पिक्चर्सच्या परिवारासोबत यानिमित्ताने आम्ही जोडले गेलो आहोत. दिग्दर्शक, कलाकार सगळेच नावाजलेले आहेत. त्यांच्यासोबत काम करताना मजा आली.’’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *